गंगापूर, (प्रतिनिधी): प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास मोफत वाळू देण्याच्या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. लाभाच्यांना वाळू देण्यास टाळाटाळ केली जाते.
मात्र, वाळूमाफियांना चोरीसाठी मोकळे रान दिले जाते, असा आरोप चव्हाण यांनी केला. यावेळी झालेल्या चर्चेत गौण खनिज विभागाचे काम बाहेरील व्यक्ती करत असल्याचे समोर आल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
ढोरेगाव शिवना नदीपात्रातून पकडलेले जेसीबी माफियांनी पळवल्याची घटना ताजी असताना महसूल विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा तालुक्यात आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी काही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे रखडत आहे. यात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला.















